Thursday, June 9, 2016

असच अस्तेय भौ...!

"आपल्याला नै आवडत भो जाती बीती..अन् आपण मानित बी नै ते...आई शप्पत..! खोट्टं कयला बोलाव भो.
तुला सांगतो नवले आपण लै काम केलय् गोरगरिबांसाठी.. हव..! 
अन् तेच्यात बी एस शी ,एस टी तुला सांगतो बघ एन टी - बिन टी सगळे ...साऱ्या केटेगरी बर्ं का..हव..!
दरवर्षी आपण वह्या वाटितो गरीबांना..! 
अन् तुला सांगतो बघ... कार्यक्रम एकदम जंगी बर्ं का...हव..एकदम जंगी...! हे मोक्कार लोकं..झेड पी बिड पि चट...हव..!
गेल्या वर्षी त भौ ...आमदार साहेब न भौ ....! तुला सांगतो नुसता धुर भौ नुसता धुर...!
बैनर तर इच्चारुच नको...हेई शप्पथ....! एकदम कड़क...हव...!
फुल्ल हवा...! नुसता धूर च काढतो भौ आपण...!बातमी अस्ति न आपली ... पेप्रात..!
पुण्यनगरी म्हणू नको, सक्काळ म्हणू नको इथून तिथून चट...हव...! 
ओळखी लै आपल्या...! नुसत्या फोनवर .....नुसत्या फोनवर कामं ...! 
वह्या वाटप सोबत टोरलामेंट अस्ति एक टेनिस बॉलवर...!"
तो सांगतच होता...
"लास्ट टाइम त्यांची जरा जास्तच जळली...अन् तुला तं महितच हे आपल्या गावात तेंचि टूरटूर जरा जास्तीच् होऊन राहिली ते..! मंग म्हनलं होऊन जाऊ दे..! आशे गपगार झाले म्हणून सांगू बिट्या...हव...!"
तो सांगतच होता....जरासा थांबून मला बोलला की....
"बर्ं ते जाउंदे, तू कस काय बॉ इकडं आज..! कही काम होतं का...!"
"नाही , विशेष नाही.... आलो होतो सहजच."--- मी.
"ओक्के."---तो
"अरे तो आपला, एस टी आई झाला नं,-सेल टैक्स इंस्पेक्टर, म्हंटलं चला जाता जाता अभिनंदन करुन जावं त्याचं."-मी.
"हम्..... आज काल काय कोणीबी काही बी होतय्..... मी तं आइकलय की कहितरि घोळ करुनच झालय ते.....यश टी आय."-तो
"नाही रे, हुशार हे तो पहिल्यापासून."- मी
"जाऊ दे रे, तुला बी लै पुळका हे त्यांचा.....!"-तो.
"त्याच्या अभिनंदनाचं बैनर नाही लावलं का रे तू..!"-मी.
"हे बघ भौ, तुला हे नं.... कही कळणार नहीं पाह्य...अरे ते लोकं लै बेरकि अस्तेत भो....बरोबर रंग दाखितेत येळेवर..! तुझ्या लक्षात नै यायचं भौ... जाऊ दे...!" - तो.
"अरे, पण तू तर बोलत होता नं तू काय मानीत नाही ते." - मी.
"तेच सांगतो न मी तुला, आपण अजिबात मानीत नहीं जाती बीती ते....जात पात काय रे..आपलेच खेळ सारे..! पण गावात जरा येगळं वातावरण हे भौ....! ते लोकं कोणाचेच नै भौ....!"-तो.


मी गांवातून बाहेर निघालो आणि क्षणभर माझी नजर एका बैनर वर स्थिरावली त्यावर लिहिलं होतं.....

"साऱ्यांचीच  जिरवून भाऊंची तंटा मुक्ति अध्यक्ष पदी निवड"

ठोकम् ठोक
महेश नवले

1 comment: