Saturday, September 24, 2016

मुलगी झाली...!


मला मुलगी झाली...
आज शक्ती माझ्या घरात प्रकट झाली....

तुझे स्वागत...

तू माझी सानुली
अन माझी साऊली
तूच माझी प्रेममयी
माय माझी माऊली

साकार रूप शक्ती तू
साक्षात रूप भक्ती तू
सानुली माझी परी
असे द्वार मुक्ती तू

तू विहंग कल्पना
तू मुक्त संवेदना
असे तूच प्राणमयी
ईश्वरीय चेतना

तू वायूची गती
तू अवकाशी मिती
तूच तेज अग्नी गे
तू विश्वाची मती

तथागताचेच गे
कारुण्यमयी ध्यान तू
साकारले ध्यानातुनी
त्याचाच अभिमान तू

तू दिव्य तेज गे
अनाहती नाद तू
नाद ओंकारास गे
करुणामयी साद तू

राही तू रखुमाई तू
तू स्वरा माधुरी
गार्गी तू मैत्रेयी तू
तूच शिव शाबरी

तूच जनाई असे...
विठाई तूच गं
तूच माऊली असे...
कान्हाई तूच गं

तुझे स्वागत...

 सर्वांग सुंदर परमेश्वरी शक्तीच्या सर्वव्यापी विश्व चेतनामयी कारुण्य रुपी हे शक्ती....
तुझे मनोमन स्वागत...स्वागत...स्वागत..!Friday, September 16, 2016

पॅरा ऑलिम्पिक म्हणजे खरा ऑलिम्पिक

तुम्ही आहात या ईश्वरी सत्तेचे खरे खुरे वारसदार...!
तुम्हीच आहात तो दैवी संदेश विधात्याचा....!
दिलखुलास, मनमौजी, दिग्विजयी....!
तुमच्या पराभवाची पराकाष्ठा झाली सदैव दाही दिशांनी...तुम्ही पुरून उरलात..... आणि पराभव असा काही शब्दच अस्तित्वात नाही हे अखिल विश्वाला प्रदर्शित केलं...!
तुमच्या अस्तित्वाला सदैव अमान्य करणाऱ्या या आत्मकेंद्री विश्वरूपी समूहाला दाखवून दिलं कि तुम्हीच आहात त्या निर्मात्याचा सर्वांग सुंदर आविष्कार ....!
तुम्हीच आहात ती ईश्वरी अनुभूती जी शरीराने नाही तर चैतन्याने उर्जित होते आणि हेच चैतन्य मानवी जगण्याचे नवे आयाम प्रस्थापित करते.
तुम्हीच आहात ती विश्वरूपी ध्येयासक्ती जिला फक्त आणि फक्त निर्माताच कवेत घेऊ शकतो.......आमच्या सारख्या स्वार्थकेंद्री रातकिड्यांना तुमचं दिव्यत्व दिसुच शकत नाही..!
तुम्हीच आहात ते चैतन्य शिल्प जे अनंत हातांनी कोरलंय निर्मात्यानं...... आम्ही तर त्या चैतन्याचे निव्वळ भग्नावशेष...!
तूम्हिच आहात निर्मात्याची निर्माण करण्याची प्रेरणा, अपेक्षा, अन स्वप्नपूर्ती....!
तुम्ही शिकवता जगणं... मरणाला विसरून....!
तुम्ही शिकविता उडणं... पंखांना सोडून...!
तुम्ही शिकविता हसणं.... आसवांना टिपून...!
तुम्ही शिकविता बघणं..... अंधाराच्या पल्याड....!
तुम्ही शिकवीता धावणं.... स्वतः च्या खूप पुढे...!
तुम्ही शिकविता हरायचं कसं...... पराभवाला...!
आणि दिग्विजय असतो तुमच्या चित्तात सदैव...!
तुमच्या साठी नसते स्पर्धा .... असते फक्त जिद्द..!
तुमच्या साठीच असते जगण्याची मूलभूत प्रेरणा..!
तुम्हीच आहात
फक्त तुम्हीच आहात या निर्मात्याच्या डोळयांतला विश्व निर्मितीचा खरा खुरा समाधान.....!
तुम्हाला त्रिवार वंदन..!

माझ्या अखिल विश्वातील सर्व पॅरा ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेल्या बांधवांना सप्रेम समर्पित.

विमलहरी