Sunday, June 12, 2016

जंगलराज पेक्षा भयानक....!

जंगलात फिरताना एक वाघ भेटला....!
दचकलोच....!
हसला अन् बोलला ,"अहो मानुस...ओ मानुस .... या जरा बसा........गप्पा मारुयात.....खूप दिवसांचं साठवून ठेवलय.....जरा मोकळं करुयात...बसा...
अन् तुम्ही असं काय दचकतायत राव, माझीच फाटते तुम्हाला बघून..........
रक्ताची चटक माझ्या पेक्षा तुम्हालाच जास्त..!"
ऐकून हादरलोच...!
तो आणखी बोलू लागला.." हादरल्या सारखं काय करताय, खरं तेच बोलतोय मी.., अहो माणूसराव, तुम्ही आम्हाला जंगल राज, जंगल का कानून म्हणून हिनवत असता, पण मला सांगा आम्ही तरी निसर्गाच्या न्यायाने चालतो हो...आमची सारी उठाठेव अस्तित्वासाठी, तुमच्यासारखं नाही हो...!"
"आमच्या सारखं नाही म्हणजे ... आम्ही काय करतो असं..?"---मी
"अहो चिड़ताय काय असं .... मानुस आहात तुम्ही...चिड़ताय काय..? आणि हो मी सांगत होतो आमची लढाई अस्तित्वासाठी तुमच्या सारखं नाही वर्चस्वासाठी...
तुमचं सारं वर्चस्वासाठी ......!
मी मोठा की तू मोठा..!
शिकार करणारा मी आणि शिकार झालेला हरिण दोघेही आपापला धर्म सांभाळतो...दोघे ही जीवाच्या आकांतानं जिवासाठीच धावतो...!
तुमच्या सारखं नाही जीव घेण्यासाठी ....!
जंगलातही म्हाताऱ्या वाघाची दहशत असते बर्ं.... वृद्धाश्रम नसतात इकडे आणि म्हणून माकडंही शेपुट ओढ़त नाही आमची..!
अहो इकडे आमच्या जंगलात मानुस म्हणजे शिवी आहे शिवी...!
निसर्गानं सर्वात सूंदर बनवलं होतं तुम्हा माणसांना .......किती कीळसवाने आहात तुम्ही....!
घाणेरडा हव्यास आणि फुकटच्या स्वार्थापायी काय दलिन्दर अवस्था करुन घेतलीय तुम्ही..
आम्हाला जंगल राज म्हणून हिनवता आणि स्वतः किती किती नर्ड्यांचा घोट घेत असता हिन जाती अभिमानापायी.....
जंगलात दंगली घडत नाही हो......तुमच्यात होतात ....... कानून आहे आमचा आणि आम्ही पाळतो......तुम्ही मात्र सत्ता आणि सम्पत्तिच्या जोरावर आणखी किती लक्तरे लोळवणार आहात तुमच्या न्यायव्यवस्थेचे....! आणखी किती रक्त शोषणार आहात तुम्ही चारीत्र्याचे, एकतेचे अन् नितिमत्तेचे ........
तुमचं हे तुम्ही उभं केलेलं चित्र दुरुन जरी अन्त्ययात्रा वाटत असली तरी ही तुमची विकारांची नग्न वरात आहे आणि त्यात तुम्ही सारे सरसकट सामिल आहात.....मानुस असल्याचा माज चढलाय तुम्हाला माज.....!"

मी शरमेनं मान खाली घातली अन् काही तरी बोलावे म्हणून बोललो की,
"असू द्या शेवटी मानुस ही जनावरच आहे एक."

वाक्य पूर्ण होताच आवेशानं तो गरजला,
"खबरदार, जर स्वतःला जनावर म्हणून घेशील तर,आम्ही तो आमचा अपमान समजतो.......आणि मान अपमानासाठी गळे चिरण्याची आमची रीत नाही..म्हणून वाचलास....चल निघ आता.... !"मानुस म्हणून घेताना
महेश नवले

No comments: