Tuesday, July 26, 2016

जंगल समजून घेताना...!

एक जंगल होतं.
तिथे सगळे प्राणी होते.
कोल्हे होते, लांडगे होते...
ससे होते, हरीण होते....
अगदी तसेच बिबट्या होता, वाघ होता, सिंह पण होता....
वाघ आणि सिंह जंगलाचा राज कारभार पाहत होते.

सगळे गुण्या गोविंदाने राहत होते.

बिबट्या नेहमीच कोल्हा, लांडगा, ससा आणि हरीण यांच्या वर हल्ला करायचा आणि त्यानं सारे हैराण होऊन जात असे.

बिबटया ने हल्ला करू नये म्हणून कायदा झाला आणि त्याला त्याची सीमा ठरवून दिली.

आता बिबट्याचे हल्ले थांबले काही प्रमाणात.... 
आणि कोल्हे आणि लांडगे  यांचे हल्ले वाढायला लागले.

जंगलाचं राज्य आता बिघडायला लागलं होतं...!

जंगलात पाहिल्यासारखं काहीच राहिलं नाही.

एके दिवशी कोल्ह्याने आणि लांडग्याने बिबट्यावर हल्ला केला.
इतर जंगलातले सारे बिबटे एकत्र आले.
काहींनी कोल्हे धरले तर काहींनी ससे...
काहींनी लांडगे धरले तर काहींनी हरणं...

नुसतं धुमशान...

सगळ्या जंगलात हाहाकार होता.

आणि त्या जंगलावर तेव्हा सुद्धा वाघ आणि सिंहाचं राज्य होतं.

By
Vimal-hari

Sunday, July 24, 2016

स्वराज्य आणि अच्छे दिन...!

महाबळेश्वराहून प्रतापगडावर पायी जाण्याला माझा तसा विरोधच होता मात्र बहुमतासमोर करणार काय? निघालो...! अर्ध्याच्या वर चालून आल्यावर मेन रस्ता सोडून समोर दिसणाऱ्या प्रतापगडा कडे बघत कच्ची वाट तुडवायला पण माझा विरोधच होता , पण परत ... निघालोच.....! आता काय रस्त्यात दरड आडवी आली, अचानक पाऊस वाढला आणि ओढा पातळी सोडून वाहत आडवा..! या साऱ्या प्रकरणात एक गोची अशी झाली कि सारे मित्र एका दिशेला पांगले आणि मी एकटाच एका दिशेला.... मोबाइलला रेंज नव्हती.
आता आपलीच वाट आपण शोधा..!
प्रतापगड सोडून, मागे फिरून, मेन रस्ता पकडून पुन्हा महाबळेश्वरला हॉटेल वर जाऊन बाकीच्यांची वाट पाहनेच आता योग्य होते, म्हणून निघालो.
पाऊस आता उघडला होता, ढग दाटलेलीच होती, गार हवा आणि हिरवा निसर्ग.... सारं विलक्षण...!
एक दीड तास पायपीट केली तरी मेन रस्ता दिसेना मात्र एक छोटी दहा बारा घराची वाडी दिसली, मी चकरवलोच जरा.... कारण येताना दिसली नव्हती काही...!
असो वाडीत पोहचल्यावर एका भारदस्त धिप्पाड देहयष्टीच्या बाबांनी स्वागत करून समोरच्या बाजीवर बसायला सांगितलं...!
पाणी पिऊन मी बाबांना विचारलं की "  बाबा , रस्ता चुकला अन इकडे आलो बघा."
" पण जायचं कुठं लेका तुला?"- बाबा
" निघालो होतो प्रतापगडावर पण आता महाबळेश्वर ला."-मी
"असं तर...! आला कुठून नेमकं ते."-बाबा
"औरंगाबादहून."-मी
"औरंगाबाद..? म्हणजे ते औरंगजेबाचं का?"-बाबा
"हो....तेच..!"- मी
"मंग सरकार कोण तुमचं.....म्हणजे औरंगजेब कि शिवाजी राजे..."-बाबा
" हा काय प्रश्न बाबा ,अहो अर्थातच शिवाजी महाराज....तुम्ही मराठवाड्यातील लोकांना काय समजता, आमचं देव आहे शिवाजी राजे..!"-मी
" नाही तसं नाही , मंग औरंगाबादला कसं राहता मंग"-बाबा
" नोकरी निमित्त...!"-मी
"म्हणजे सरकारची....!"-बाबा
"हो , सरकारची..!"- मी
"आमचा बहिरजी पण आहे बरं का सरकारच्या सेवेत...!"-बाबा
"वा छान"-मी
"नाही तरी मला तुमच्या अंगावरचे कापडं पाहून वाटलंच जरा, म्हटलं हे असं सोंग घालून कोण आलं बॉ वाडीवर...पण सरकारच्या सेवेत म्हटल्यावर असतं असं सारं...पुण्य पाहिजे लका पदरी, सरकारच्या सेवेत काम करायला, खूप अंधार संपून असं सरकार लाभलय आपल्याला, किती दिवस हाल काढले लका आता कुठं चांगले दिवस दिसायला लागले बघ, देवच आला बघ धावून, आता इथून पुढचे काही वर्षे बघ कसं साऱ्या जनतेचं स्वप्नातलं राज्य उभं राहिल बघ..!"-बाबा

मी सध्याच्या सरकारचं मार्केटिंग बघून स्तंभित झालो.

बाबा शून्यात काही विचार करत होते....किती तरी वेळ...!

अचानक प्रतापगडावरून एका मागोमाग एक अशा अकरा तोफांची सलामी धडकली आणि परिसर चांगलाच दुमदुमला..!

" राजे आले, गडावर राजे आले, आज बरोबर बारोमास उलटून गेले.. गेल्यावेळी आले तव्हा देवीचा मोठा उच्छ्व होता, म्हणजे या वेळी सुद्धा उच्छव होणार....!"- बाबा

आनंदाने उड्या मारतच बाबा प्रतापगडाच्या दिशेनं झाडीत निघून गेले....दिसेनासे झाले...!

मला काही समजेनासे झालं..!
अचानक विजा कडकडल्या आणि धो धो पाऊस कोसळायला लागला, पाऊस इतका होता की दोन फुटावरचं पण दिसत नव्हतं..!
मी आंधळ्या सारखा धडपडतच होतो की मला हॉर्न आणि गाड्यांचा आवाज ऐकू आला आणि मी आता मेन रस्त्यावर पोहचलो होतो.


मला काही समजलं नाही पण
विलक्षण होतं ...... नक्की विलक्षण...!

बाबा शिवाजी राजांच्या स्वराज्याचं कौतुक करत होते.... खऱ्याखुऱ्या स्वराज्याचं.... आणि मी किती उल्टं समजत होतो....!

स्वराज्य येऊ द्या
अच्छे दिन
नक्की येतील.


By
Vimal-hari

Tuesday, July 19, 2016

गुरुपौर्णिमा..!

गुरु आई माझी अशी
कशी गड्या सांगू तुला
किती चुकलो मुकलो
तरी दावी वाट मला

माझी वाट मीच चुके
सारे कळते वळते
एक गुरु आई माझी
मला तरी सांभाळते

विकारी हा जीव असा
आई जीव गुदमरे
तूच आधार माऊली
देवाचेच रूप खरे

गुरुमाऊली भेटली
अगा असे भाग्य थोर
चित्त जेव्हा गुरु ठाई
मनी नाचू पाहे मोर

चित्त इकडे तिकडे
जीव खोल खोल दरी
तोल ढळतो ढळतो
गुरु माऊली सावरी

आई सावर गे मला
नको मला गं अव्हेरु
खूप फिरलो फिरतो
तरी तुझंच लेकरू


गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने *अवघा रंग एक व्हावा* अशी सद्गुरू चरणी प्रार्थना
🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏

Friday, July 15, 2016

विठ्ठला पांडुरंगा...!

विट्ठला तू आहेस
ईथे
माझ्यात, माझ्यासोबत
पण का ही जळमट उभी राहते तुझ्यात आणि माझ्यात भिंत बनून...
देवा ही भिंत तुटु दे...
आणि भक्तिचा बांध ओसांडून वाहु दे....

पांडुरंगा तू दिला आहेस सार्थ संकेत तुझ्या आस्तित्वाचा....
पन आसक्तीचा दोर का आवळतो गळ्या भोवती...
देवा हा फास तुटू दे...
अन् तुझा श्वास माझ्यातून वाहु दे...

विट्ठला पांडुरंगा
तू खेळला होता कधी माझ्या हातात हात घेऊन फूगड़ी...
पण वया सोबत वाढत गेलेल्या विकारांनी दूर नेलं मला...
आज तुझा हात माझ्या हातात असू दे...
कधीच न सोडण्यासाठी...
👬

Friday, July 8, 2016

संसार तुझा माझा....!

तो:( खूपच समजुतिच्या स्वरात)
जन्मों जन्मिची गं साथ
दैव दोघाचं लागतं
इथं तुझं माझं नाही
दैव गुपित सांगतं

ती:( त्याला समजून घेत)
गोड संसार रे इथे
सदा लागायचा नाही
कडु गोड हिशोब तू
कधी मागायचा नाही

तो:( आणखी समजून सांगत)
सखे संसार संसार
थोरा मोठ्यांचा गं धाक
सखे संसार संसार
एक गाड़ी दोन चाक

ती:( पुन्हा त्याला समजून घेत)
वेगवेगळे रे चाक
परि आस एक आहे
वेगवेगळे रे दोघ्ं
परि श्वास एक आहे

तो:(तिच्या समजूतदार पणावर खुश होत)
सखे कशाला यमक
सखे कशाला तमक
जुळे तुझा माझा सुर
हेच सुखाचं गमकआता दोघ्ंही:( समजून उमजुन स्माइल देत)
जुळे तुझा माझा सुर
हेच सुखाचं गमक
चला सुर जुळवूयात
By
Vimalhari

Wednesday, July 6, 2016

चर्च आणि समोरचा बार

त्रिदांनी एक गोष्ठ सांगितली आणि विचार करायला पण....

तर गोष्ठ अशी...

एका चर्च समोर बार सुरु होतो.
बार बंद व्हावा म्हणून चर्च मधे प्रार्थना होते.
काही दिवसांनी बार बंद होतो.
त्यासाठी बार मालक चर्चला जबाबदार ठरवितो.
कोर्टात खटला दाखल.
बार बंद होण्याशि आमचा काहीच सम्बन्ध नाही असा कबूली जबाब चर्च देते.
तर चर्च मधिल प्रार्थनेमुळेच माझा बार बंद झाला असे बार मालक सांगत असतो.


न्यायाधीश अजूनही संभ्रमात

प्रार्थनेवर चर्च पेक्षा बार मालकाचा विश्वास जास्त असतो हे बघून.

गोष्ठ संपली
आता विचार सुरु...देव श्रद्धेत आहे आणि श्रद्धा हृदयात
आणि हृदयात देव...
औंढा नागनाथाच्या मंदिरात शिवपिंडीवर पाय ठेवून झोपलेले विसोबा आणि त्यांचा गोड शिष्य नामा....! संत नामदेव
काशिहुन आणलेलं पाणी गाढवाला पाजनारे संत एकनाथ...!
कांदा मुळा भाजी अवघि विठाई माझी....संत सावता महाराज....!
गोपाला गोपाला देवकीनन्दन गोपाला.....संत गाडगे महाराज..!
आणि किती किती...!


विश्वास असा असावा....
देव आहेच जळी स्थळी काष्टि पाषाणी..!


"कांदा-मुळा-भाजी-शिवपिंड-काशीचे पाणी-गाढव"

चर्च आणि समोरचा बार

चला स्वच्छ अन्तःकरणाने जग बघुयात
चला देव बघुयात
By
Vimalhari
Sunday, July 3, 2016

सिद्धार्थ गौतम गाडगे महाराज....!

सावकार लूटत होते तेव्हा सुद्धा आणि आज ही....!
कष्टाचा पैसा असेल तर करतो मानुस मदत सहज, कारन मदतीची गरज ओळखून असतो तो नेहमीच.... मात्र तोच पैसा असतो जेव्हा हरामचा तेव्हा सुरु होते सावकारी.... आर्थिक मदत म्हणून दिलेला पैसा भावनिक कोंडी करुन टाकतो आणि हीच कोंडी आत्महत्येस परावृत्त करते कर्जदाराला...... म्हणून अवैध सावकारी गुन्हा ठरतो..... खरं तर अशे सावकार म्हणजे व्यवस्थेला लागलेली किड आहे आणि सरकारनं खूप स्ट्रॉन्ग किड़नाशक फवारनं अत्यंत गरजेची बाब झालेली आहे.
याच सावकारांच्या विरुद्ध गाडगे महाराजांनी कठोर प्रहार केला होता..... आणि तो प्रहार फ़क्त शब्दशः नसून गाडगेबाबांनी सावकारांना अक्षरशः ठोकुन काढले होते...

आज सुद्धा तीच गरज आहे. सावकारी वृत्तीच्या फुस्फुसणाऱ्या विषारी वेटोळ्याला चिरडून टाकन्याची.

गाडगे महाराजांनी सुद्धा पहिला प्रहार याच वृत्तिवर केला होता आणि त्यानंतर हा आधुनिक सिद्धार्थ गौतम होण्याच्या दिशेने निघाला तो निघालाच आणि आधुनिक गौतम म्हणजेच गाडगे बाबा या निश्चित ठिकाणी पोहचल्यावर जे घडलं ते जग पाहतेय आणि तेवढ़याच निर्लज्ज पने दुर्लक्ष देखील करत आहे........त्यांच्या शिकवणिकडे.....!
गाडगे बाबा यांनी देव किती सोप्पा करुन सांगितला....
गाडगे बाबा यांनी आंधळ्या श्रद्धा किती सहज दाखविल्या...
गाडगे बाबांनी किती सहज फटकारला असुड़ भक्तिमधे घुसलेल्या भम्पकपणावर.....
गाडगे बाबांनी किती सहज जोडला ह्या हृदयिचा गोविन्द त्या हृदयीच्या गोपालाशि...
गाडगे बाबांनी किती सहज साफ केला कचरा मेंदुतला आणि मनातला....
गाडगे बाबांनी किती सहज तोडल्या शृंखला जाती पातीच्या....
गाडगे बाबांनी किती सहज सुचविला सेवा धर्माचा मार्ग करुन सेवा कुष्ठरोगी बांधवांची.....
गाडगे बाबांनी किती सहज रोवला मानवता धर्माचा झेंडा अखिल विश्वावर....

आणि आपण साऱ्याच सरसकट नालायक़ पीढ़िनं किती सहज विसर पाडला त्या सिद्धार्थ गौतमाचा आणि या आधुनिक सिद्धार्थ गौतम गाडगे बाबांचा सुद्धा...!

सावकार जगतील आणखी माजतील आणि माझा बळीराजा मात्र कफल्लक होऊन हाय खाऊन मरील .......आम्ही मोठ्या मोठ्या ठेम्ब्या मिरवू ...... आणि टाकू अड़गळिला त्या महान विचारधारेला त्या आमच्या महान सिद्धार्थ गौतम गाडगे बाबांना.....!

चला पेटवूयात राण ......
करुयात कोळसा सावकारी पाशाचा....
काढुयात धिंड या वृत्तिचि...
आणि समजून घेऊयात शिकवण
गाडगे बाबांची.....मनोमनी......!


रुजुवु बिज मानवतेचे
By
Vimalhari


काउंटर नंबर तीन..!

काउंटर नंबर एकची रांग खुपच हळू हळू पुढे सरकत होती.एखाद्या गोगलगाई सारखी....!
रांगेवर रांगेतुन काही प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या..!
"मेल्याला काय लकवा अलाय की काय...पवना घण्टा झाला मुर्दी रांग जिथच्या तिथच्..!"-एक आज्जी.
"एक्चुअली मी ना रेगुलरली ऑनलाइनच वर्कआउट करत असते बट यावेळी इकडे एप्रोच केलं आणि हयांच् हे असं.. सो स्लो ना...!"- ऐज 23 च्या आसपास आणि कॉल सेंटरचा जॉब असेल.
"हे मानुस लैच बोगस हे....अन् मुज्जर हे सलं लास्ट टाइम तर हानायचच राहिलं होतं, च्यायला जाउदे शिस्टीमच ख़राब हे".एक उत्साही कार्यकर्ता टाइप.
"सिस्टम ला दोष देण्यात काय अर्थ नाही एक्चुअली या मैडम बोलल्या तसं ऑनलाइन असायला हवं...मी MBA स्टूडेंट असुन सुद्धा असा रांगेत उभा....सच अ रेडूक्योलस..!"एक अर्थातच वरच्या 23 च्या कॉलसेंटरला इम्प्रेस करण्याच्या नादात रांगेतला.

असो..!

रांग ज्याच्या मुळे पुढे सरकत नव्हती तो निर्विकार चेहऱ्याने रांगेतल्या सगळ्या प्रतिक्रिया खऱ्या आहेत ह्याची जाणीव करुन देत होता.

"ओ बाबा, अहो ही रांग चुकीची आहे, तुमचं काम कॉउंटर नंबर तिन वर होईल तिकडे जा...! - तो निर्विकार चेहरा.
"अहो साहेब हे आधीच सांगायचं होतं ना...!"-ते बाबा.

मी सुद्धा रांगेत गेल्या अर्ध्या तासापासून उभा होतो.
आणि त्या आजोबांचे आणि माझे काम सेमच होते.
मी सुद्धा सध्याची रांग सोडून काउंटर नंबर तिन कड़े वळलो.
त्या काउंटरवर माझे काम पाच मिनिटांत झाले.

"अरे व्वा सर, तुमचं काम तर पाचच मिनिटांत झालं."-पहिल्या रांगेतला एक.
"अहो तसं काही नाही, मी सुद्धा आधीचा अर्धा तास चुकीच्या रांगेत घालवलाच ना...!"-मी

 "खरोखर आपण कोणत्या रांगेत उभा आहोत हे समजनं खूपच महत्वाचं....कारन खरं काम तर पाचच मिनिटांत होणार हे नक्की असतं." - मी मनाशीच् बोलत निघालो.

आणि माझी नजर समोरच्या बोर्ड वर गेली तिथे लिहिलेलं होतं-काउंटर नंबर एक - पैशातून मिळणाऱ्या सुखांसाठी
काउंटर नंबर तिन - सदा सर्वकाळ आत्मिक सूखानुभूति साठी

बोर्ड आल्या आल्या दिसेल अशाच ठिकाणी लावला होता, मी मात्र खुपच उशिरा नजर वळवली होती.


विचार करा आणि रांग ओळखा
म्हणून आजची फिरकी
By
Vimalhari