Posts

Showing posts from May, 2021

दगड

दगड हो दगड  नाद कानी हा घुमतो  होण्या दगड मि आता  दगड़ात हो रमतो  आला वारा गेला वारा  दगड हा साक्षी त्याचा  नाही आल्याचा आनंद  शोक नाही हो गेल्याचा  आहे असतो नेहमी  दगड हो दुनियेत  काय असतो असून  समजते जानिवेत  असुनिया नसे असा  दगड हो दगड तू  नाही नाही का म्हणावे  असताना दगड तू  स्थिर निश्चल हा जगी  घाव जगाचे सोसतो  साक्षिभाव हृदयीचा  दगडच की असतो  अंतरीच्या मालकांना  भेटण्याची खूण हाच  स्थिर आणि साक्षितुन  देई प्रमाण हे सांच  होई दगड तू आता  बघ दिसेल रे देव  नको धरु हे ही ते ही  सोड सारी उठाठेव  🙏🏼🙏🏼🙏🏼

अंतरीचे मालका रे

 दिसमान बरे नाही  असे का रे तू बोलतो  बघ कैलासाचा राणा  तुजसवे रे डोलतो  साऱ्या त्याच्या रे योजना  तोच बघ राबवितो  झाल्या गेलेल्या क्षणाला  तूच का रे आठवितो  श्वास त्याचा रे घेतला  श्वास त्याचा रे सोडला  सारे हक्क त्या स्वाधीन  प्रश्न मोट्ठा का पडला  उगी म्हणतो का मग  देवा तूच सारं तुझं  जेव्हा घेतो तो तयाचे  का उगी माझं माझं  अशी त्याची रे करनी  तुला नाही रे ठिकाना  तूच कावरा बावरा  हो रे आधी तू रिकामा  आले आले गेले गेले  ज्याचे त्याचे त्याच्या गावा  वृत्ति तुझी स्थिर राहो  घडो त्याची नित सेवा  बघ तूच तुला आता  दूर उभा ते राहून  लीला त्याची त्याचे खेळ  दंग होशील पाहून  आता होणार तू त्याचा  दिले झोकून झोकून  त्याने गिळले रे तुला  बघ नजर रोखून  आहे तुजसवे तोच  काल आज आणि उद्या  अंतरीच्या मालका वर  दृढ़ विश्वास राहुद्या  🙏🏼🙏🏼🙏🏼

रिकामा हो रिकामा

 पाहतो तो सदाही सर्वकाल सर्वकाही  तूच लोचने ही तुझी  झाकुनि का ठेवीले  स्पर्शितो तो तुला रे रोमांच बघ हे दाटले  तूच रोमंचित या  देहांस का न पाहिले  बोलतो तो तुझ्याशी  जे असावे तुज सवे  बोलने हे तुझ्याशी  तूच का न जाणिले  गंध हा सर्वेश्वराचा  दाटला दाही दिशा  तुज पासोनी तूच का  दूर त्यांसी ठेविले  सांडूनिया रिक्त व्हावे  मोकळे आकाश रे  कृष्ण अभ्रांस याच वेळी  सांग का बोलविले  किती अट्टाहास तुझा  दूर त्यांसी ठेवणे  राहतो तुझ्या अंतरी रे  का कधी न पाहिले  वाचले किती जरी तू  हेच का अन तेच का  ज्ञान हे तुझे रे वेड्या  अजूनि का न फेकिले  साधा सोप्पा सरळ  रिकामा हो रिकामा  अंतरीचे मालक तुझे रे  बघ उभे ते ठाकले  🙏🏼🙏🏼🙏🏼