Sunday, February 19, 2017

रयतेचा राजा

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यासाठी ज्या प्रमाणे हिंदु

धर्मियांनी रक्त सांडले त्याप्रमाणे मुस्लिम धर्मियांनी ही रक्त सांडले आहे.

शिवरायांच्या काळात जातीभेदाला थारा नव्हता. शिवरायांच्या राज्यात

स्त्री सुरक्षीत होती. शेतकरी आंनदीत होते. शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या

कष्टाचे मोल करणारा राजा म्हणुन शिवबांची ख्याती आहे.
============
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रेरणा आणि उत्साह, शिवरायांनी काळाला आणि समाजाला आकार दिला. सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्य निर्माण केले. शिवराय फक्त योध्देच नव्हते तर मानसतज्ञ, शेतीनिष्ठ, उद्योजक होते. शिवरायांचे ध्येय हे स्वराज्य होते धर्मराज्य नव्हते. त्यांना अन्याय अत्याचाराची प्रचंड चीड होती. आपल्या राज्यात कोणावर ही त्यांनी अन्याय होऊ दिला नाही. राजे रायतेच्या सुख दु:खात सहभागी होत असे. रयतेला त्रास देणारांना त्यांनी माफ केले नाही. गावकुसाबाहेर राहणार्‍या दलितांच्या हातात तलवार देण्याचे काम पहिल्यांदा शिवरायांनी केले. शिवराय माणसाच्या कल्याणासाठी लढले. त्यांच्या कार्याचा आज आपण किती आदर्श घेतोत? आज माणुसकी रसातळात जात आहे. जाती-धर्माच्या नावाखाली एकमेकांना लढवले जात आहे. दोन समाजात द्वेष निर्माण केले जात आहे.  शिवरायांचे नाव घेवून काही तथाकथीत पुढारी आपल्या राजकीय पोळ्या भाजुन घेत आहेत. अशा ढोंगी पुढार्‍यांना धडा शिकवण्याची गरज आहे. शिवरायांचे विचारच समाजाला तारु शकतात. आजच्या तरुणांनी शिवचरित्राचे वाचन करुन चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न करावा.

शेतकर्‍यांच्या मालाला
योग्य भाव होता
शिवरायांचा राजकीय व्यवहार स्वच्छ होता. शिवकाळात भ्रष्टाचार झाला नाही. शिवाजीराजे स्वत: निर्मळ व पारदर्शक होते. त्यांची सक्त ताकीद असायची की, प्रजेच्या गवताच्या काडीला व भाजीच्या देठाला हात लावू नका, गावच्या पाणवठ्यावरचे पाणी गरजेपेक्षा जास्त घेवू नका, मोबदल्याशिवाय शेतकर्‍यांची फळे तोडु नका, झाडे तोडु नका, हवेच असेल तर जीर्ण झालेले झाड तोडापण त्या ठिकाणी दुसरे झाड लावा.अशी प्रजेची काळजी घेणारे राजे जगात फक्त शिवाजी राजेच झाले. आज सगळीकडे भ्रष्टाचाराची बजबजपुरी आहे. पैसे दिल्याशिवाय शेतकर्‍यांना सातबारा मिळत नाही ही किती मोठी शोकांतिका आहे. आपण पर्यावरणाचा र्‍हास करत आहोत. झाडांची मोठया प्रमाणात कत्तल होत आहे. झाडे लावण्यासाठी  पुढाकार घेतला जात नाही. झाडे लावण्याची योजना मात्र गिळुन टाकण्याचे काम आजचे पुढारी आणि अधिकारी करत आहेेत. त्यावेळी राजेंनी पर्यावरणाची काळजी घेतली म्हणजे राजे किती दुरदृष्टीचे होते हे दिसून येते. शिवाजीराजे विज्ञाननिष्ठ आणि प्रयत्नवादी होते. शेतकर्‍यांना शेतीसाठी प्रोत्साहन दिले. शेतीमालाला उत्तम किंमत दिली. पडीक जमिनीची मशागत करण्यासाठी रयतेला अर्थपुरवठा केला. शेतसारा ठरवून दिला. महसुल अधिकारी नेमण्याची प्रथा राजांनी सुरु केली. शिवरायांनी हजारो वर्षाची शस्त्रबंदी, शिक्षणबंदी उठविली. प्रत्येकाला शस्त्र घेण्याचा अधिकार दिला. आज शेतीची आणि शेतकर्‍यांची काय अवस्था आहे हे सगळ्यांना माहित आहे. शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळत नाही. पाण्याची टंचाई आहे. शिवकाळात राजेंनी बांधलेले तलावे आणि बंधारे आज ही तसेच आहे पण आजच्यागुत्तेदारांनी बांधलेले तलावे आणि बंधारे कधी फुटतील याचा नेम नसतो. रयतेला गुलाम करणार्‍या देशमुख, देशपांडे यांचे वाडे पाडुन महाराजांनी जमीनदोस्त केले. त्यांनी इतर रयतेसारखी साधी घरे बांधुन रहावे असा हुकूम सोडला. आजच्या पुढार्‍यांनी आणि उच्च अधिकार्‍यांनी यापासून काही बोध घ्यावा.

स्त्रीकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होत नव्हती.

शिवरायांच्या राज्यात महिलांचा आदरच केला जात होता. मग ती महिला शत्रुपक्षाकडील असली तरी तिचा सन्मान होत होता. महिलावर अन्याय, अत्याचार करणार्‍यांना राजेंनी माफ केले नाही. मुलीवर बलात्कार करणार्‍या राझांच्या पाटलांचे हातपाय तोडण्याचे आदेश दिले होते.1678 साली सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीनं बेळवाडीच्या किल्याला वेढा दिला. या किल्याची किल्लेदार एक स्त्री होती तिचे नाव सावित्रीबाई देसाई, या बहाद्दुर स्त्रीने 27 दिवस किल्ला लढवला पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सुड भावनेने सावित्रीबाईवर बलात्कार केला. ही बातमी ऐकुन शिवाजीराजे संतापले. त्यांनी सकुजी गायकवाडचे डोळे काढावयास लावले व त्यास जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीनं शत्रु असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणुन गय केली नाही असे होते शिवरायांचे कायदे, आज कित्येक महिलावर अन्याय, अत्याचार होतात. अत्याचार करणार्‍यावर कुठली ही कठोर कारवाई होत नाही. शिवकाळात स्त्रीकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होत नव्हती.

शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक

शिवरायांच्या पदरी 57 टक्के मुस्लिम सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवरायांना प्रामाणिकपणे मदत केली आहे. त्यामध्ये स्वकीय मुस्लिम होते. तसेच शत्रुकडील मुस्लिम देखील होते. त्यांनी शिवरायांचे नेतृत्व आनंदाने मानले. निष्ठावंतांची नावे पुढील प्रमाणे.

  सिद्दी अंबर वहाब-हे हवालदार होते. 1647 साली कोंढाणा किल्ला जिंकण्यास सिद्दी अंबरने राजास मदत केली.

  नुरखान बेग-हे शिवरायांच्या सैन्याचे पहिले सरनौबत होते. त्यांनी स्वराज्य उभारणीसाठी शत्रुबरोबर प्राणपणाने लढा दिला.

  सिद्दी इब्राहीम-हे शिवरायांचे अंगरक्षक होते. अफजलखान भेटीच्या प्रसंगी सिद्दी इब्राहीम यांनी राजांचे अंगरक्षण केले. तर कृष्णाजी कुलकर्णीने शिवरायांच्या कपाळावर तलवारीने वार केला. 1675 मध्ये सिद्दी इब्राहीम यांनी सुरुंग लावून फोंडयाचा किल्ला जिंकला, तेव्हा राजांनी सिद्दी इब्राहीम यांचा सत्कार केला व त्यांची फोंडयाच्या किल्लेदारपदी नेमणुक केली.

  सिद्दी हिलाल-हे शिवरायांच्या घोडदलात सेनापती होते. शिवाजी राजे पन्हाळा येथे अडकले असताना राजांच्या सुटकेसाठी सिद्दी हिलालने नेताजी पालकारांच्या खांद्याला खांदा लावून सिद्दी जोहर बरोबर लढा दिला.

  सिद्दी वाहवाह-हे सिद्दी हिलालचे पुत्र असून वडीलांच्या सोबत ते शिवरायांच्या सैन्यात होते. सिद्दी जौहरशी लढतांना ते जखमी झाले. त्यांना कैद करण्यात आले. शिवरायांची सुटका व्हावी यासाठी या युवकाने प्राण गमावले पण सिद्दी जौहरला शरण गेला नाही.

  रुस्तुमेजमान-रुस्तुमेजमान हे शहाजीराजांचे जिवलगमित्र रणदुल्लाखान यांचे पुत्र होते. तसेच ते शिवाजीराजांचे आदीलशाही दरबारातील जिवलग मित्र (हेर) होते. अफजलखान ठार मारण्याच्या इराद्याने निघालेला आहे ही खात्रीलायक बातमी राजांना प्रथम रुस्तुमेजमानने सांगितली. रुस्तुमेजमानने राजांना हुबळीच्या लढ्यात मदत केली. तसेच 1663 साली नेताजी पालकर यांना देखील मदत केली होती. रुस्तुमेजमानने राजांना प्रामाणिक मदत केली व स्वराज्य उभारणीस हातभार लावला.
 
मदारी मेहतर-हे राजांचे विश्‍वासू मित्र होते. 17 ऑगस्ट 1666 रोजी आग्राच्या सुटकेप्रसंगी मदारीने प्राण धोक्यात घालुन राजांना मदत केली. त्यात मदारी पकडले गेले. औरंगजेबाच्या सौनिकांनी मदारीला पाट फुटे पर्यंत मारले पण मदारीने राजे कोठे गेले सांगितले नाही. अशा निष्ठावान मित्राला राजांनी स्वराज्यातील उच्चपद घेण्याचा आग्रह केला तेव्हा मदारीने विनम्रपणे नकार दिला आणि सिंहासनावरची चादर बदलण्याचे काम घेतले.

 काझी हैदर-हे शिवरायांचे 1670 ते 73 पर्यंत वकील होते. त्यानंतर राजांचे खाजगी सचिव झाले. फारसी पत्रलेखनांची जबाबदारी राजांनी त्यांच्यावर सोपविली. वकील,सचिव, पत्रलेखन इ. महत्वपुर्ण जबाबदारी सांभाळणारे काझी हैदर राजांचे किती विश्‍वासू मित्र असतील?

  शमाखान-हे शिवरांचे सरदार होते. मोगलांचे किल्ले ताब्यात घेण्यासाठी शमाखानाने प्राणाची बाजी लावली.

 दौलतखान-हे शिवरायांच्या आरमारदलाचे प्रमुख होते. यांनी 1680 साली उंदेरीवर हल्ला केला. 1678 साली साली खांदेरी लढ्यात पराक्रम गाजविला. 1674 साली सिद्दी संबुळचा पराभव केला.

 दर्यासारंग-हे शिवरायांच्या आरमाराचे सुभेदार होते त्यांनी खांदेरीवर विजय मिळविला. बसनुर जिकंण्यास मदत केली.

 हुसेनखान मियाना-हे शिवरायांच्या लष्करातील अधिकारी होते. यांनी मसौदखानच्या अदोनी प्रांतावर हल्ला केला व 1679 साली बिळगी, जामखिंड आणि धारवाड जिंकले.

 इब्राहीमखान- हे आरमारातील अधिकारी होते. दर्यासारंग यांच्याबरोबर शत्रुशी लढा दिला.
सिद्दी मिस्त्री- हे देखील शिवरायांच्या आरमारातील अधिकारी होते.
  सुलतानखान-हे आरमारात अधिकारी होते तर 1681 साली सुभेदार झाले.
दाऊदखान- हे देखील आरमारात सुलातानखानानंतर सुभेदार झाले. पोर्तुगीजाकडुन दारुगोळा मिळविला.

 इब्राहीमखान-हे राजांचे तोफखाना प्रमुख होते. अनेक लढ्यात तोफांचा वापर करुन शत्रुला पराभुत करण्यात इब्राहीमखानाचा मोठा वाटा आहे.

  चित्रकार मीर महंमद-हे शिवकालीन चित्रकार असून शिवाजी राजांचे जगातील पहिले आणि प्रत्यक्ष चित्र मीर महंमद यांनीच रेखाटले(पुरंदर तहाच्या वेळी) मीर महंमद यांनी शिवाजीराजांचे चित्र नसते रेखाटले तर आज आपणाला राजांचे खरे चित्र उपलब्ध झाले नसते.

  मौनीबाबा आणि बाबा याकुत-पाटगावचे मौनीबाबा आणि केळशीचे बाबा याकुत हे मुस्लिम संत शिवराय यांचे हितचिंतक होते. त्यांच्या भेटीसाठी शिवाजीराजे पाटगावला आणि केळशीला अनेकवेळा गेले. त्यांनी शिवरायांना मोलाची मदत केली.
यासह अन्य निष्ठावंत मुस्लिम सैनिक शिवरायांच्या पदरी होते. यातील एकानेही गद्दारी केली नाही. त्यावेळच्या लढाया ह्या राजकीय होत्या, जाती-धर्माच्या नव्हत्या. मदारी मेहतर यांच्या निधनानंतर त्यांची कबर राजांनी रायगडावर बांधली. मुस्लिम सैनिकांना नमाजासाठी राजांनी रायगडावर मशिद बांधली. मुस्लिम स्त्रियांना बहिणीसारखे वागविले. शिवकाळात एक ही धार्मिक दंगल झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यासाठी ज्या प्रमाणे हिंदु धर्मियांनी रक्त सांडले त्याप्रमाणे मुस्लिम धर्मियांनी ही रक्त सांडले आहे. शिवरायांच्या काळात जातीभेदाला थारा नव्हता. शिवरायांच्या राज्यात स्त्री सुरक्षीत होती. शेतकरी आंनदीत होते. शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या कष्टाचे मोल करणारा राजा म्हणुन शिवबाची ख्याती आहे. सर्वधर्म समभावाची बीजे पेरुन ती माणसांच्या मनात रुजवणारा आदर्श राजा म्हणुन छत्रपती शिवाजी महाराजाकडे पाहिले जाते.राजा

No comments: