Sunday, October 16, 2016

अंतरीचे महाराज..!

हे त्रिनेत्रधारी गौरीहरा शिवशंकरा तुझी लीला अपरंपार आहे. तु लीलाधारी लीला रचवितो, तू खेळिया आम्हांस खेळवितो, तुझी सत्ता या अवघ्या विश्वावर राज्य करते, तूच कर्ता आणि करविता, तूच या विश्वचैतन्यमयी सत्तेचे अधिष्ठान, तूच आहेस चैतन्यमयी उर्जेला आधार, हे सर्वेश्वरा तुला कोटी कोटी नमन.

सद्गुरू शंकर महाराजांच्या लीला जेव्हा आपण साक्षी भावातून प्रकट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या अनंत बोध करून देणाऱ्या ठरतात. सजगतेणे आणि सहज भावातून समजून घेत असताना अलगद फुलपाखरू हातावर येऊन बसावं असं काहीतरी मनोमनी प्रकट होऊ लागतं. महाराजांचे प्रेम अंतरातुनी वाहू लागते आणि मोहरून जाऊन मन मयूर अनंत रंगछटांचा मोर पिसारा फुलवून थुई थुई नाचू लागते. 

ईश्वरीय अनुभूतीप्रति श्रद्धा आणि भक्तिच्या संगमातून जो विलक्षण प्रवाह वाहू लागतो त्यातुन आत्मा जणू असा रंगून जातो जसा कि इंद्रधनूच्या रंगाची बरसात आत्म्याच्या मंदिरी व्हावी. 
ईश्वरीय चेतना अंग भर नाचू लागते अन विकारी दाह असे शांत होतात जणू काय त्यांना हिमालयाची शीतलता मिळावी. महाराजांच्या प्रेमाची नशा जशी जशी चढू लागते तशी तशी मन आणि त्यानं रचलेली मायेची भक्कम बूरुजे ढासळू लागतात आणि आत्मा मुक्त विहंग आकाशी भरारी घेऊ लागतो. 
अविनाशी आत्मा जेव्हा ईश्वरीय चेतनेशी एकरूप होऊ लागतो तेव्हा 'अवघा रंग एक व्हावा' हि भावना सर्वेश्वराच्या चित्ती सुद्धा स्थापित होत असावी. 
महाराजांच्या चेतनेशी नातं घट्ट होऊ लागतं आणि अंतरीच्या कीर्तनात विठ्ठल नाचू लागतो. 
महाराजांची चेतना मनांत स्फूरु लागते आणि अंतरात ज्ञानदेवी 'ओम नमोजी आद्या' बोलू लागते. 
महाराजांची नजर जेव्हा अंतरीचा अहं गिळून टाकते तेव्हा आत्मा 'आनंदाचे डोही आनंद तरंग' होऊन जातो. 
अंतरातल्या ईश्वराशी तादात्म्य साधु लागले की महाराज ह्रिदयी प्रकटू लागतात आणि हीच तृष्णा वाढीस लागली की महाराज विकारी हलाहल लीलया पिऊन टाकतात आणि आत्म्याला त्याच्या सुंदर शुद्ध स्वरूपाचा आविष्कार होऊ लागतो.
अंतरातल्या सूक्ष्म लहरी जीव अनुभवू लागतो तेव्हा जणू त्या लहरी क्षीरसागराच्या असून जगतपालकाच्या चरणी स्पर्शत असतात.
अंतःकरण जेव्हा महाराजांचेच होऊन जाते किंवा महाराजच जेव्हा अंतःकरण होऊन जातात तेव्हाच खरे 'पसायदान' अंतरी प्रकटते.
आणि हळूच शब्द ब्रह्म प्रकटते
शंकरचेतनेचा अविष्कारु।ह्रिदयी प्रकटे हा भास्करु। शीतल निर्मळ निश्चल सागरू। अंतरीचे महाराज।।
विश्व चेतनेचा साक्षात्कारु। ह्रिदयी घेतसे आकारू। परी असे निर्गुण निराकारु।अंतरीचे महाराज।।
या विश्वाचा आधारू। प्रकटे प्रेम आदरू।शुद्ध सात्विक सुंदरु।अंतरीचे महाराज।।
।।ओम नमो आदेश।।

-महेश हरिभाऊ नवले
-पैठण
-9763147471
-nawalemahesh1@gmail.com.


No comments: