Saturday, September 24, 2016

मुलगी झाली...!


मला मुलगी झाली...
आज शक्ती माझ्या घरात प्रकट झाली....

तुझे स्वागत...

तू माझी सानुली
अन माझी साऊली
तूच माझी प्रेममयी
माय माझी माऊली

साकार रूप शक्ती तू
साक्षात रूप भक्ती तू
सानुली माझी परी
असे द्वार मुक्ती तू

तू विहंग कल्पना
तू मुक्त संवेदना
असे तूच प्राणमयी
ईश्वरीय चेतना

तू वायूची गती
तू अवकाशी मिती
तूच तेज अग्नी गे
तू विश्वाची मती

तथागताचेच गे
कारुण्यमयी ध्यान तू
साकारले ध्यानातुनी
त्याचाच अभिमान तू

तू दिव्य तेज गे
अनाहती नाद तू
नाद ओंकारास गे
करुणामयी साद तू

राही तू रखुमाई तू
तू स्वरा माधुरी
गार्गी तू मैत्रेयी तू
तूच शिव शाबरी

तूच जनाई असे...
विठाई तूच गं
तूच माऊली असे...
कान्हाई तूच गं

तुझे स्वागत...

 सर्वांग सुंदर परमेश्वरी शक्तीच्या सर्वव्यापी विश्व चेतनामयी कारुण्य रुपी हे शक्ती....
तुझे मनोमन स्वागत...स्वागत...स्वागत..!