Sunday, August 28, 2016

उठ, आता...जाळून टाक...!

उठ आता जाळून टाक.......
भेदरट जगण्याची भिखारडी उष्ठावळ....
सांगितलेली, लादलेली..... कुणीतरी....
तू आहेस आग...
तू आहेस विस्तव..
उठ अन जाळून टाक....

"विस्तवात त्या अजूनही,ती तशीच आहे आग
जाळणाऱ्या त्या ठिणगीचा,त्याच्यात आहे राग
त्या आगीचाच वणवा,होणार आता आहे
त्याच्यात जाळणारा,जळणार आता आहे"

उठ अगं तू सुद्धा...
ज्वाला बनून उसळू दे ...
तुझ्यातला जन्मोजन्मीचा द्रोह...
किती सहन करशील आता...
पेटवून दे राण सारं...
होऊ दे धुमशान.....

"भिडुनी ती किनाऱ्याला, संपून तिथे गेली
त्वेषाने एकटीच, विरुनी तिथे गेली
द्रोहात तिच्या दर्या, खवळणार आता आहे
त्याच्यात जाळणारा, जळणार आता आहे"

या रक्त पिणाऱ्या जळवांची
विल्हेवाट लावली पाहिजे....
मुर्दाडांच्या पिसाळलेपणाला
अंकुश आता लावला पाहिजे...
जंगलात आता वणवा...
धुमसला पाहिजे....!

"दुतर्फा रस्त्यांच्याही, मूडद्यांची रचली रास
रक्ताचा आहे पाट, कोंडला मुक्त हा श्वास
त्या श्वासा साठी रस्ता, वळणार आता आहे
त्याच्यात जाळणारा, जळणार आता आहे"

हि शर्यत जगण्याची अन मरणाची...
आणि रोजचं मरण जाळण्याची...
राख कर असल्या जीण्याची....
पुसून टाक ते सारे व्रण..
जे इथल्या जगण्यानं तुज्या भाळी कोरले...

"हि शर्यत रे अघोरी, मरणही सोबती धावे
जगण्याशी धडपडताना, मरणाने जिंकून घ्यावे
हे मरणच हरण्यासाठी, पळणार आता आहे
त्याच्यात जाळणारा, जळणार आता आहे"

बघ तूझा द्रोह कसा...
आगडोंब उसळू लागलाय...
आणि त्याचीच हि आभा कि काय...
अंधार आता संपू लागलाय...

"अंधारी या युगाला, हे तेज कधी न ठावे
थरथरत्या देहा मधुनी, भय व्यापुनी उरावे
भय अवघे हे क्षणात, पळणार आता आहे
त्याच्यात जाळणारा, जळणार आता आहे"

आज तोडून टाकू या शृंखला....
नकळत पायात अडकून राहिलेल्या...
आणि झुगारून देऊ बंधनं सारी
स्वातंत्र्याची, स्वातंत्र्यासाठी...!

"बंदिस्त स्वातंत्र्यात, आसमंत कोंडुनी सारा
शृंखला मुक्तीच्या आणी, भिंतीच्या वरी शहारा
या स्वातंत्र्याचा अर्थ, कळणार आता आहे
त्याच्यात जाळणारा, जळणार आता आहे."


उठ ,आता... जाळून टाक...!

By
Vimalhari

2 comments:

Mangesh said...

Utkursht, prernadyayi!

Jigar Rajput said...

आज पन तोज टोन शब्द मधे येतोय। नवले भाउ :-)