Sunday, August 28, 2016

उठ, आता...जाळून टाक...!

उठ आता जाळून टाक.......
भेदरट जगण्याची भिखारडी उष्ठावळ....
सांगितलेली, लादलेली..... कुणीतरी....
तू आहेस आग...
तू आहेस विस्तव..
उठ अन जाळून टाक....

"विस्तवात त्या अजूनही,ती तशीच आहे आग
जाळणाऱ्या त्या ठिणगीचा,त्याच्यात आहे राग
त्या आगीचाच वणवा,होणार आता आहे
त्याच्यात जाळणारा,जळणार आता आहे"

उठ अगं तू सुद्धा...
ज्वाला बनून उसळू दे ...
तुझ्यातला जन्मोजन्मीचा द्रोह...
किती सहन करशील आता...
पेटवून दे राण सारं...
होऊ दे धुमशान.....

"भिडुनी ती किनाऱ्याला, संपून तिथे गेली
त्वेषाने एकटीच, विरुनी तिथे गेली
द्रोहात तिच्या दर्या, खवळणार आता आहे
त्याच्यात जाळणारा, जळणार आता आहे"

या रक्त पिणाऱ्या जळवांची
विल्हेवाट लावली पाहिजे....
मुर्दाडांच्या पिसाळलेपणाला
अंकुश आता लावला पाहिजे...
जंगलात आता वणवा...
धुमसला पाहिजे....!

"दुतर्फा रस्त्यांच्याही, मूडद्यांची रचली रास
रक्ताचा आहे पाट, कोंडला मुक्त हा श्वास
त्या श्वासा साठी रस्ता, वळणार आता आहे
त्याच्यात जाळणारा, जळणार आता आहे"

हि शर्यत जगण्याची अन मरणाची...
आणि रोजचं मरण जाळण्याची...
राख कर असल्या जीण्याची....
पुसून टाक ते सारे व्रण..
जे इथल्या जगण्यानं तुज्या भाळी कोरले...

"हि शर्यत रे अघोरी, मरणही सोबती धावे
जगण्याशी धडपडताना, मरणाने जिंकून घ्यावे
हे मरणच हरण्यासाठी, पळणार आता आहे
त्याच्यात जाळणारा, जळणार आता आहे"

बघ तूझा द्रोह कसा...
आगडोंब उसळू लागलाय...
आणि त्याचीच हि आभा कि काय...
अंधार आता संपू लागलाय...

"अंधारी या युगाला, हे तेज कधी न ठावे
थरथरत्या देहा मधुनी, भय व्यापुनी उरावे
भय अवघे हे क्षणात, पळणार आता आहे
त्याच्यात जाळणारा, जळणार आता आहे"

आज तोडून टाकू या शृंखला....
नकळत पायात अडकून राहिलेल्या...
आणि झुगारून देऊ बंधनं सारी
स्वातंत्र्याची, स्वातंत्र्यासाठी...!

"बंदिस्त स्वातंत्र्यात, आसमंत कोंडुनी सारा
शृंखला मुक्तीच्या आणी, भिंतीच्या वरी शहारा
या स्वातंत्र्याचा अर्थ, कळणार आता आहे
त्याच्यात जाळणारा, जळणार आता आहे."


उठ ,आता... जाळून टाक...!

By
Vimalhari

Friday, August 19, 2016

सिंधू तू जिंकलीस...!

क्रिकेट वेडे मूर्ख आम्ही आज बघत होतो तुझा खेळ टक लावून.
आयुष्यात पहिल्यांदा आम्ही बघितली एक पूर्ण बॅडमिंटन ची मॅच फक्त आणि फक्त तुझ्यामुळं.....आपल्या देशासाठी....!
तुझ्या प्रत्येक पॉइंटला आपसूकच 'एस्स्स' निघायचं...!
प्रत्येक पॉईंट अपडेट होत होता वॉट्स अप ग्रुप वर...!
देश कधी तुला तुझ्यासोबत वाटला कि नाही माहित नाही पण आज नक्की उभा होता तुझ्यासाठी...!
विश्वास ठेव .... मी खरं सांगतोय...!
तू जिंकली तेव्हाच जेव्हा आम्ही आलो ऑफिसमधून लवकर तुझा खेळ पाहण्यासाठी आवर्जून...!
जेव्हा चालू होता विषय तुझ्याच गोल्ड मेडल चा दिवसभर...!
सोनं आवडणाऱ्या देशातल्या बायकांच्या देशातील तू....गोल्ड सोडणार नाही असा चुटकुला सुद्धा ऐकला दिवसभर आज...!
तुझं मेडल जिंकणं हेच आमच्यासाठी सोन्याची खान सापडल्या सारखं आहे...!
तू आपल्या देशाची 'शोभा' होऊ दिली नाहीस.. उलट देशाभिमान जागा केलांस मना मनांत.....!
खरं तर त्या मेडलची 'शोभा' वाढली तुझ्यामुळे...आज...!
तुझा तो प्रत्येक पॉईंट नंतरचा विजयी अविर्भाव किती तरी ताकद देऊन गेला आम्हाला आज .... इथे....आमच्या आयुष्यात....!
खरंच खूप खूप धन्यवाद..!

सिंधू तू जिंकलीस.

देशाभिमान वाढविण्याचा बहुमान तुला मिळत राहो निरंतर.

आज संपूर्ण देश तुझा ऋणी आहे....आभारी आहे.

By
Vimalhari

Wednesday, August 17, 2016

गेमर लोकांच्या देशातला ऑलिम्पिक...!


कांदा फोड, सुरपरुम्ब्या, चक्करमुंडी, गुल्लेर टोला, विटी दांडू, गोट्या, सूर पाट्या, लपाछपी, डम डम, टायर, गज खुपसा खूपशी, विष अमृत, काठ्या लाठ्या हे मी खेळलेले माझ्या लहानपणीचे खेळ.
(या पैकी कुठलाही खेळ ऑलिम्पिक मध्ये नाही.)

शाळेत खो खो, कब्बडी, क्रिकेट असायचा.

नावं वेगवेगळी असतील मात्र कमी अधिक फरकानं आपण सारेच सहसा हेच खेळ खेळत असतो.

आता पोलीस भरती आणि मिलिटरी भरती वाले मित्र गोळाफेक करताना दिसतात.

सैनिकी शाळेच्या परिसरात कुणी एक धनुर्धर दिसतो आणि आम्ही हरखून जातो.

पत्ते, कॅरम, व्यापार, चोर पोलीस, नाव गाव आडनाव, गाण्याच्या भेंड्या हे काही इनडोअर गेम...!

आणि आपला देश क्रीडा क्षेत्रात मागे आहे हि आपली ओरड...!

सबवे सर्फ, टेम्पल रन आणि तत्सम क्रीडाप्रकारात आपण नक्की गोल्ड मिळवू हा माझा पक्का विश्वास...!


असो
आपण खूप गांभीर्याने घ्यावी अशी ही गोष्ट आहे.
जी भाग्यवान मुलं ऑलिम्पिक ची खेळ खेळतात त्यांना सुद्धा घाणेरड्या राजकारणापासून दूर ठेवणं आपलं प्रधान कर्तव्य आहे.
ऑलिम्पिक किंवा क्रीडा धोरण म्हणून येणारा निधी खेळासाठीच वापरला जाणं गरजेचं आहे.
क्रिकेट सारख्या खेळातून उभा राहणारा पैसा इतर खेळाच्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे.


शेवटी खूप महत्त्वाचं

गेम करण्यापेक्षा गेम जिंकण्याकडे भर दिला पाहिजे.

गेमर नको खेळाडू निर्माण करणारे राष्ट्र होणं गरजेचं आहे...!


चला आपल्या गेमर विचारांतून काही तरी विधायक करूया....!
चला खेळाडू घडवूयात...!
By
Vimalhari

Friday, August 12, 2016

महाड आणि मदारीच्या निमित्ताने...!

महाड असो की मदारी चित्रपट दोन्ही गोष्टी भ्रष्टाचारावर प्रहार करतात मात्र एक प्रश्न या ठिकाणी विचारावा वाटतो कि पैशाची नशा उतरणार ती कशी?
या नशेत समजेल का जीव गामावल्यालचं दुःख
या नशेत समजेल का देश, समाज, माणुसकी...!
या नशेत समजेल का कमावलेली प्रतिष्ठा खोटी आहे म्हणून...!

काल परवा एक मित्र भेटला जुना...!
खूपच आग्रह करून त्याच्या घरी घेऊन गेला...
घर कसलं बंगलाच तो .... टोलेजंग.....
बघून अवाक झालो....
क्षणार्धात त्याचा व्यवसाय आणि माझे शिक्षण compare करू लागलो......थोडा नरमलोच....!
तो त्याची यशाची कहाणी सांगू लागला, अर्थातच माझं त्याकडं लक्ष नव्हते.
चहा आला , घाई घाई घेतला अन निसटलोच तिथून...!
का कुणास ठाऊक पण बाहेर आल्यावर खूप छान वाटलं.
स्वतःच्या विचारांची लाज हि वाटली, वाटलं की काय आपण मित्राची प्रगती बघू शकत नाही.

थोडं समोर आल्यावर दुसरा मित्र भेटला,
टपरीवर चहा घेत घेत गप्पा गप्पा मध्ये विषय निघाला अन मी त्याला विचारलेच कि आज अमुक भेटला होता घरी घेऊन गेला वगैरे वगैरे...!
मित्र सांगू लागला की अरे त्याच्या मोठ्या बंगल्याचं , गाडीचं आपल्याला काय कौतुक नाही सारं लुटीचं साम्राज्य..!
आणि नंतर पुढचे 30 मिनिटे तो त्याचे काळे धंदे सांगत होता.
मी त्या टपरिवरून दुसऱ्या मित्राचा निरोप घेतला.

आता मी स्वतःच्या आत्ता पर्यंतच्या वाटचालीस स्वतःप्रति पूर्ण समाधानी होतो.
कारण माझ्या छोट्याशा घरातून जर कुणी चहा घेऊन निघाला तर किमान मला शिव्या तरी देत नसेल म्हणून...!
आपण काय करतो यावरून आपल्या संपत्तीचा अंदाज कुणी हि सहज लावू शकतो एवढं ते सोप्प आहे. आणि त्यातूनच तर प्रतिष्ठा मिळत असते .
मात्र पैशे खाणाऱ्यांच्या ते काय लक्षात येत नाही.
आणि ते निब्बर मनानं गब्बर होत राहतात.
देव त्यांना सद्बुद्धी देवो..!

पैसे कमवताना अप्रत्यक्ष पने आपण किती संसार उध्वस्थ करतोय आणि याचे विपरीत परिणाम उद्या आणि आज सुद्धा आपल्या आयुष्यवर होत आहे हे लौकर लक्षात यावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.By
Vimalhari

Friday, August 5, 2016

महाड- एक भीषण हल्ला...!

नमस्कार आज फिरकी विथ महेश नवले या विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत.
महाड येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेतील सर्व मृत बांधवास भावपूर्ण श्रद्धांजली.
या दुर्दैवी घटनेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत-
नदी या विषयातील तज्ञ सौ. सावित्री महाबळेश्वरकर.
स्थापत्य विषयातील तज्ञ श्री. पुलेश्वर महाडजोडे.
हवामान तज्ञ श्री. वरून पाऊसधरे.

तर पहिला प्रश्न असा की घटनेतील खरा दोषी कोण?

सौ.सावित्री: मला असं वाटतं की नदी हि जीवनदायीनि असते. अन मातृह्रिदयी असते. ती काळपुरुष म्हणून जेव्हा समोर येत असते तेव्हा ती स्वतः कधी दोषी नसते तर ती तिची परिस्थितीजन्य प्रतिक्रिया असते.

श्री.पुलेश्वर: मला वाटतं की पूल जेव्हा कोसळून पडतो तेव्हा तो टीकेचा धनी ठरू लागतो मात्र त्यात तो स्वतः कधी दोषी नसतो तर तो दुर्लक्षित ठरलेला असतो आणि तुटून पडणे हा त्याचा आक्रोश असतो.

श्री.वरून: या सगळ्या घटनेत जर नदी, पूल दोषी नसेल तर बोट हे धो धो कोसळणाऱ्या पाऊसाकडे उचलले जाते. मात्र पाऊस हा निसर्गाचा सर्वांग सुंदर आविष्कार आहे. सर्व जण त्याच्या प्रतीक्षेत असतात.


तर एकंदरीत दोषी कोण हे अनुत्तरीत आहे असं आपल्याला वाटतं का?

सौ.सावित्री: पाऊस हेच संपूर्ण दोषी आहे. धो धो कोसळल्यावर नदी काय करणार. पाऊस जबाबदार आहे या घटनेला सर्वस्वी.

श्री.पुलेश्वर: या घटनेला सर्वस्वी जबाबदार नदीच आहे. प्रवाहाच्या जोरदार विरोधात पूल कोसळून गेला आहे.

श्री.वरून: या घटनेला जबाबदार खरे तर पूल च आहे. जीर्ण असला म्हणून काय झाले किती तरी ऊन वारा पाऊस झेलण्याची त्याची क्षमता असली पाहिजे.

श्री.पुलेश्वर: पण किती ऊन, वारा, पाऊस सहन करायचा पुलाने तरी. ते सहन करत करत च तर पूल जीर्ण झालेला असतो , वृद्ध झालेला असतो, तरुणपणी ज्या जोमाने तो तग धरून राहतो तोच डगमगू लागतो.पूल कसा दोषी असू शकतो.

सौ.सावित्री: नदी ला दोष देण्यात काहीच तथ्य नाही कारण तिच्यात साचत जाणारा गाळ, वाढत जाणारी अशुद्धी आणि त्यातून वाढत जाणारी पाणी पातळी आणि दाब या गोष्टींवर नदीचं नियंत्रण कसं असू शकतं.

श्री.वरून: आपण धो धो कोसळणाऱ्या पावसाला कधीच दोष देऊ शकत नाही कारण भौगोलिक स्थान आणि पावसाचे प्रमाण हे सर्वश्रुत आहे. त्यात पावसाचा काय दोष!

अजूनही प्रश्न अनुत्तरित राहतोय असं नाही वाटत?

सौ.सावित्री: गाळ, अशुद्धी, आणि तीव्र उतार यावर नियंत्रणाचे उपाय कोण करणार?
श्री.पुलेश्वर: जुन्या झालेल्या पुलांना पुनर्जीवन कोण देणार?
श्री.वरून:निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठीचे नियोजन कोण करणार?

सौ.सावित्री: नदी आज रूप बदलत आहे, त्याचा अभ्यास कोण करणार?
श्री.पुलेश्वर: पूल आणि रस्ते सुरक्षा याच्याकडे लक्ष कोण देणार?
श्री.वरून: बदलत्या हवामानाचे निष्ठ अनिष्ट परिणाम कधी गांभीर्याने घेणार आणि कोण घेणार?

मला वाटते की सौ. सावित्री महाबळेश्वरकर, श्री. पुलेश्वर महाडजोडे आणि श्री. वरून पाऊसधरे यांनी विचारलेले सर्व प्रश्न हेच या प्रश्नाचे उत्तर आहे.

माणसाची स्वार्थी भ्रष्ट असंवेदनशील व्यवस्था हीच खरी दोषी आहे.
हा अपघात नसून अतिरेकी हल्ल्यापेक्षा हि निंदनीय कृत्य आहे.


पुन्हा भेटूयात
तो पर्यंत वाचत राहा
फिरकी विथ
Mahesh Nawale