Sunday, July 24, 2016

स्वराज्य आणि अच्छे दिन...!

महाबळेश्वराहून प्रतापगडावर पायी जाण्याला माझा तसा विरोधच होता मात्र बहुमतासमोर करणार काय? निघालो...! अर्ध्याच्या वर चालून आल्यावर मेन रस्ता सोडून समोर दिसणाऱ्या प्रतापगडा कडे बघत कच्ची वाट तुडवायला पण माझा विरोधच होता , पण परत ... निघालोच.....! आता काय रस्त्यात दरड आडवी आली, अचानक पाऊस वाढला आणि ओढा पातळी सोडून वाहत आडवा..! या साऱ्या प्रकरणात एक गोची अशी झाली कि सारे मित्र एका दिशेला पांगले आणि मी एकटाच एका दिशेला.... मोबाइलला रेंज नव्हती.
आता आपलीच वाट आपण शोधा..!
प्रतापगड सोडून, मागे फिरून, मेन रस्ता पकडून पुन्हा महाबळेश्वरला हॉटेल वर जाऊन बाकीच्यांची वाट पाहनेच आता योग्य होते, म्हणून निघालो.
पाऊस आता उघडला होता, ढग दाटलेलीच होती, गार हवा आणि हिरवा निसर्ग.... सारं विलक्षण...!
एक दीड तास पायपीट केली तरी मेन रस्ता दिसेना मात्र एक छोटी दहा बारा घराची वाडी दिसली, मी चकरवलोच जरा.... कारण येताना दिसली नव्हती काही...!
असो वाडीत पोहचल्यावर एका भारदस्त धिप्पाड देहयष्टीच्या बाबांनी स्वागत करून समोरच्या बाजीवर बसायला सांगितलं...!
पाणी पिऊन मी बाबांना विचारलं की "  बाबा , रस्ता चुकला अन इकडे आलो बघा."
" पण जायचं कुठं लेका तुला?"- बाबा
" निघालो होतो प्रतापगडावर पण आता महाबळेश्वर ला."-मी
"असं तर...! आला कुठून नेमकं ते."-बाबा
"औरंगाबादहून."-मी
"औरंगाबाद..? म्हणजे ते औरंगजेबाचं का?"-बाबा
"हो....तेच..!"- मी
"मंग सरकार कोण तुमचं.....म्हणजे औरंगजेब कि शिवाजी राजे..."-बाबा
" हा काय प्रश्न बाबा ,अहो अर्थातच शिवाजी महाराज....तुम्ही मराठवाड्यातील लोकांना काय समजता, आमचं देव आहे शिवाजी राजे..!"-मी
" नाही तसं नाही , मंग औरंगाबादला कसं राहता मंग"-बाबा
" नोकरी निमित्त...!"-मी
"म्हणजे सरकारची....!"-बाबा
"हो , सरकारची..!"- मी
"आमचा बहिरजी पण आहे बरं का सरकारच्या सेवेत...!"-बाबा
"वा छान"-मी
"नाही तरी मला तुमच्या अंगावरचे कापडं पाहून वाटलंच जरा, म्हटलं हे असं सोंग घालून कोण आलं बॉ वाडीवर...पण सरकारच्या सेवेत म्हटल्यावर असतं असं सारं...पुण्य पाहिजे लका पदरी, सरकारच्या सेवेत काम करायला, खूप अंधार संपून असं सरकार लाभलय आपल्याला, किती दिवस हाल काढले लका आता कुठं चांगले दिवस दिसायला लागले बघ, देवच आला बघ धावून, आता इथून पुढचे काही वर्षे बघ कसं साऱ्या जनतेचं स्वप्नातलं राज्य उभं राहिल बघ..!"-बाबा

मी सध्याच्या सरकारचं मार्केटिंग बघून स्तंभित झालो.

बाबा शून्यात काही विचार करत होते....किती तरी वेळ...!

अचानक प्रतापगडावरून एका मागोमाग एक अशा अकरा तोफांची सलामी धडकली आणि परिसर चांगलाच दुमदुमला..!

" राजे आले, गडावर राजे आले, आज बरोबर बारोमास उलटून गेले.. गेल्यावेळी आले तव्हा देवीचा मोठा उच्छ्व होता, म्हणजे या वेळी सुद्धा उच्छव होणार....!"- बाबा

आनंदाने उड्या मारतच बाबा प्रतापगडाच्या दिशेनं झाडीत निघून गेले....दिसेनासे झाले...!

मला काही समजेनासे झालं..!
अचानक विजा कडकडल्या आणि धो धो पाऊस कोसळायला लागला, पाऊस इतका होता की दोन फुटावरचं पण दिसत नव्हतं..!
मी आंधळ्या सारखा धडपडतच होतो की मला हॉर्न आणि गाड्यांचा आवाज ऐकू आला आणि मी आता मेन रस्त्यावर पोहचलो होतो.


मला काही समजलं नाही पण
विलक्षण होतं ...... नक्की विलक्षण...!

बाबा शिवाजी राजांच्या स्वराज्याचं कौतुक करत होते.... खऱ्याखुऱ्या स्वराज्याचं.... आणि मी किती उल्टं समजत होतो....!

स्वराज्य येऊ द्या
अच्छे दिन
नक्की येतील.


By
Vimal-hari

7 comments:

Sidd Magre said...

Jabri...

gopal belurkar said...

Jabardast....

gopal belurkar said...

Jabardast....

gopal belurkar said...

Jabardast....

Rohit Mohod said...

Khup mast sir

Anonymous said...

Great imagination.
From today to 16th century.

Shubham Dane said...

Kharch khup chan...!